कोरोनावर मात करण्याचा हा मार्ग....

Foto
औरंगाबाद :  कोरोना विषाणूने  जगभर दहशत  निर्माण केली आहे. त्यावर लस निर्माण करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या सुरू असल्या, तरी औषध उपलब्ध नाही. त्याचा संसर्गही झपाट्याने होऊ शकत असल्याने ही भीती आहे. परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य ती खबरदारी घेऊन आपण या कोरोनाच्या धोक्यापासून बचाव करू शकतो.  सांजवार्ताच्या वाचकांसाठी कोरोनाविषयीची ही सर्वंकष माहिती-
कोरोना विषाणू म्हणजे नेमके काय?
कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहित आहेत. 2003 मध्ये आढळलेला ‘सार्स’ हा आजार किंवा 2012 मध्ये आढळलेला ‘मर्स’ हा आजार हे सुद्धा करोना विषाणूमुळे होणारे आजार आहेत, परंतु डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या या उद्रेकामध्ये जो कोरोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या कोरोना विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला ‘नॉवेल’ अर्थात नवीन कोरोना विषाणू असे संबोधण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास ‘कोविड-19’ असे नाव दिलेले आहे.
 कोरोनाचे मूळ स्थान कोणते?
कोरोना हा प्राणीजगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळामध्ये आढळतो. बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणांमुळे प्राणीजगतातील सूक्ष्मजीव मानवामध्ये प्रवेश करतात.
 कोरोना विषाणू आजाराची लक्षणे कोणती?
कोरोना विषाणूशी संबंधित आजाराची लक्षणे ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडीत असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्ल्युएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्युमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.
 कोरोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा?
हा आजार शिंकण्या - खोकण्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातून पसरतो. याशिवाय शिंकण्या - खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात. अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने हे विषाणू हाताला चिकटतात. हाताने वारंवार डोळे, नाक चोळण्याच्या वा चेहर्‍याला स्पर्श करण्याच्या सवयीमुळेही हा आजार पसरू शकतो.
 कोरोनावर औषध उपलब्ध आहे का?
कोरोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णावर त्याच्या लक्षणांनुसार उपचार केले जातात. काही विशिष्ट औषधोपचारांच्या चाचण्या जगभरात चालू आहेत. जागतिक आरोग्य संघटना या विषाणूच्या प्रतिबंधासाठी लस आणि औषधे विकसित करण्यासाठी क्लिनिकल चाचण्यांद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार्यातून प्रयत्न करीत आहे.
 कोणी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा?
ताप, खोकला असलेल्या व श्वसनास त्रास होणार्या व्यक्ती.
हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने कोरोनाबाधित देशात प्रवास केलेला असल्यास.
प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केलेला आहे.
 कोरोना विषाणू आजाराची लक्षणे कोणती?
या आजाराची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, सर्दी व कोरडा खोकला. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker